(सुवर्णकण)
रायमा सेन
रोज प्रथम सूर्यनमस्कार घालते. सूर्यनमस्कारामुळे रक्तभिसरण चांगले होते. सूर्यनमस्कार हा सर्वांगासाठी सर्वात उत्तम व्यायाम आहे. सूर्यनमस्कार झाल्यानंतर मी भाज्यांचा रस पिते. न्याहारीला गव्हाचा ब्रेड, फळांचा रस, अंड्याचा पिवळा बलक काढून केलेले आम्लेट असा परिपूर्ण आहार असतो. रोज तोच तोच व्यायाम केला तर कंटाळा येतो. त्यामुळे सतत व्यायाम बदलत राहा. ज्या गोष्टी आपल्याला खायला आवडत नाहीत त्या सर्वात शेवटी म्हणजे रात्रीच्या भोजनासाठी राखून ठेवा. फळ, कच्च्या पालेभाज्या हे रात्री घ्यावं. आरोग्य राखायचे म्हणजे अती व्यायाम करून शरीराला दुखापत करून घेणे नव्हे. आपल्या मर्यादा ओळखून व्यायाम करावा, हे महत्त्वाचे आहे.
कंगना राणावत
मी भरपूर पाणी पिते. दिवसांत 8 ग्लास पाणी प्यायल्याने माझी त्वचा तुकतुकीत राहते. मी व्यायाम करून आधीच शरीर कमावल्याने मला आता खूप कष्ट घ्यावे लागत नाहीत. जीममध्ये मी आठवड्यातून फक्त काहीच दिवस जाते. मात्र रोज ध्यानधारणा आणि योग करणे मी चूकवत नाही. माझे शरीर उत्तम राहण्याचे कारण योग हेच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत रोजची किमान आठ तास झोप झालीच पाहिजे. झोप पूर्ण झाली नसेल तर प्रकृती चांगली राहूच शकत नाही.
इशा कोपीकर
शरीराचे आरोग्य राखण्यासाठी योग्य आहार आणि आवश्यक तितकी झोप या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी रोज कटाक्षाने आठ तासांची झोप घेते. ही झोप सलग नसली तरी अधूनमधून झोप काढायची. त्याचबरोबर रोज उठल्या उठल्या 1 लीटर पाणीही पिते. यामुळे शरीरातील टॉक्सीन बाहेर फेकले जातात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही भूकेले राहू नका. भूकेले राहण्यापेक्षा दर दोन तासांची थोडेथोडे खात राहायचे. चांगली न्याहारी, दुपारचे चांगले जेवण आणि रात्री अगदी हलके भोजन यामध्ये कधी एखादे फळ, कपभर चहा आणि मारी बिस्कीट किंवा सुकामेवा हे माझे रोजचे खाणे असते.
मंदिरा बेदी
मी गोड अजिबात खात नाही. विशेषतः चॉकलेट खात नाही. कारण चॉकलेटचा एक खास खायला गेले की अख्खे चॉकलेट खाल्ले जाते. कार्बोहायड्रेट किती घेता यावर नियंत्रण ठेवायला हवे. मात्र कार्बोहायड्रेटची ही गरज आहे हे लक्षात ठेवा. तीन दिवसांतून एकदा कार्बोहायड्रेट घ्यायला हवे. मी आठवड्यातील 5 दिवस रोज 40 मिनिटे व्यायाम करते. मी शाकाहारी असल्याने शरीरात प्रोटीन कमी जाते. यासाठी अंड्याचा पांढरा भाग आम्लेट करून खावा. त्याचबरोबर मोड आलेली कडधान्ये आणि सोयाचेही सेवन करावे. कोणत्याही परिस्थितीत भूकेले राहू नये. ठरलेल्या अंतराने थोडे थोडे अन्न पोटात गेले पाहिजे. यामध्ये जर भूक लागली तर एखादे बिस्कीट, सॅण्डविच व फळ खाणे उत्तम.
रोनित रॉय :
मी कधीही अती खात नाही आणि घरचे अन्नच खातो. मी शाकाहारी आहे. माझ्या भोजनात विविध धान्यांचा समावेश अधिक असतो. बाजरीची भाकरी आवश्यक असते. गहू आणि तांदूळ मी अजिबात खात नाही. मी ब्रेड, बिस्किट, समोसाही कधी खात नाही. नित्यनियमाने रोज 1 तास धावण्याचा व्यायाम करतो.
राहूल देव
आपले वय वाढत जाते तसतशी आपली श्वसनाची शक्ती कमी होते. यासाठी नेहमी दीर्घ श्वास घेऊन सोडणे महत्त्वाचे असते. याची स्वतःला सवय करून घ्यावी लागते. रोज ठराविक लीटर पाणी पिणे महत्त्वाचे नसून दिवसभर थोडे थोडे पाणी पित राहणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रोजचा 40 मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. त्यासाठी जीमलाच जाणे गरजेचे नाही. चालणे, धावणे, पोहणे किंवा तुमचा आवडता खेळ खेळणे यापैकी कुठलाही व्यायाम केला तरी चालेल. दिवसभर 5 ते 6 वेळा थोडेथोडे खावे. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन दोन्ही आवश्यक आहे. प्रोटीनने स्नायू तयार होतात आणि कार्ब्रोहायड्रेट मेंदूसाठी आवश्यक असते.
Sunday, August 1, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment